औरंगाबाद- भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची गेल्या तीस वर्षांपासून युती आहे. पण २०१४ मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूकप्रसंगी ही युती तुटली. त्यानंतर भाजपाने शिवसेनेची चांगलीच फरफट केली. फरफरटीनंतर ही सेना भाजपासोबत गेली आणि सत्तेत सहभागी झाली. पण त्यांच्यात धुसफूस सुरुच आहे. सेनेने एक वर्षापूर्वी स्वबळाचा नारा दिला आहे. अशात नुकत्याच पाच राज्यातील निवडणूक निकालात जनतेने भाजपाला सपाटून मार दिला. त्यामुळे राज्यातील भाजपाच्या नेत्यांचे डोके ठिकाणावर आले आहे. त्यामुळे भाजपा आता युतीसाठी शिवसेना नेत्यांची मनधरणी करणार आहे.
२०१४ मध्ये झालेली
लोकसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून झाली. या निवडणुकीत
राज्यातील ४८ पैकी ४३ जागांवर युतीचे
उमेदवार निवडून आले. केंद्रात भाजपाचे बहुमताचे सरकार आले. पण लोकसभेत
भाजपाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाल्याने भाजपाच्या मंडळींनी त्यानंतर झालेल्या
विधानसभेच्या निवडणुकीत युती न करता स्वतंत्र उमेदवार जाहीर केले. ही बाब सेनेला
खटकली. पण इलाज नव्हता. राज्यात सत्ता स्थापनेच्यावेळी बहुमत प्राप्त नव्हते तरी
सुद्धा भाजपाने सेनेला विचारले नाही व सत्ता स्थापन केली. त्यामुळे सेनेला विरोधी
पक्ष नेते पदावर समाधान मानावे लागले होते. पण बहुमत नसल्याने विधिमंडळात ठराव
पारित करणे शक्य नसल्याने भाजपाने सेनेशी जुळवून घेतले व थातूर मातूर खाते देऊन
सेनेची बोळवण केली. त्यामुळे दोन्ही पक्षात धुसफूस सुरूच आहे. गतवर्षी शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे भाजपाशी काडीमोड घेत स्वबळाचा नारा दिला. तरी
सुद्धा भाजपाची मंडळी हवेत होती. पण आता लोकसभेच्या निवडणुका सहा महिन्यांनी
होणार आहे व नुकतेच पाच राज्यातील निवडणूक निकाल लागले. या निवडणुकीत भाजपाचा मोठा
पराभव झाला. तीन राज्य हातातून निसटली. या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम
होणार आहे.
या तिन्ही राज्याने २०१४ मध्ये भाजपाला
मोठे यश मिळवून दिूले होते. पण आता त्यांच्या जागा घटणार आहेत. भाजपाची हवा ओसरु
लागली. मोदीलाट संपत आहे. त्यामुळे आता भाजपाला मित्र पक्षांची आठवण होऊ लागली
आहे. पाच राज्यांतील निकालानंतर शिवसेना नेत्यांनी भाजपावर मोठे तोंडसूख घेतले.
त्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडालेली आहे. देशात पुन्हा सरकार स्थापन करावयाचे
असेल तर मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. हे आता भाजपाला कळून चुकल्याने
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी बुधवारी युतीसाठी सेना नेत्यांशी
चर्चा करू असे जाहीर केले आहे. भाजपाची लाट ओसरु लागली आहे ही बाब सेनेच्या लक्षात
आल्याने सेना नेते युतीसाठी स्वतःहून भाजपाकडे जाणार नाही,
असेच दिसते.